भुसावळमध्ये ‘गणराया करंडक अवॉर्ड २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न !३२८ गणेश मंडळांचा सहभाग; ‘भुसावळचा राजा’ मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक, पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यांचाही गौरव

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहर व परिसरातील गणेशोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘गणराया करंडक अवॉर्ड २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेत भुसावळ पोलीस विभागातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३२८ गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला. यावेळी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळे, मिरवणूक स्पर्धेतील विजेते तसेच गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत दरेकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि नगरपरिषदेचे वैभव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी केले.

‘भुसावळचा राजा’ गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक

‘गणराया करंडक अवॉर्ड २०२६’ अंतर्गत उत्कृष्ट गणेश मंडळांच्या पुरस्कारांमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठानच्या ‘भुसावळचा राजा’ गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. मिरवणूक स्पर्धेत विघ्नहर्ता गणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली.

याशिवाय भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागृती गणेश मंडळ, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकरी येथील ललकार गणेश मंडळ आणि नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नशिराबाद येथील द्वारका नगर गणेश मंडळ यांनाही त्यांच्या संबंधित विभागांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गणेश मंडळांनाही शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यांचा गौरव

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे बद्री नारायण अग्रवाल, योगेश पाटील, प्रवीण ठाकूर, चेतन पाटील, मोहम्मद आलम, जितेंद्र काटे, राहुल चौधरी आणि अजय ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच ‘गणराया करंडक अवॉर्ड’ स्पर्धेचे परीक्षक राधेश्याम लाहोटी, नाना पाटील, महेश पाटील आणि राजश्री देशमुख यांना प्रमाणपत्र व शिल्ड प्रदान करून गौरविण्यात आले.

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३२८ मंडळांचा सहभाग

यंदाच्या स्पर्धेत भुसावळ विभागातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण ३२८ गणेश मंडळांनी सहभाग घेतला. त्यामध्ये भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६९, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ११८, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८९ आणि नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५२ गणेश मंडळांचा समावेश होता.

गणेशोत्सवात शिस्तबद्ध नियोजन, सामाजिक उपक्रम, उत्सवाचे व्यवस्थापन आणि मिरवणुकांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देणे, तसेच पोलीस व नागरिकांमधील समन्वय अधिक दृढ करणे हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. मोठ्या संख्येने गणेश मंडळांचा सहभाग आणि विविध घटकांचा सन्मान यामुळे ‘गणराया करंडक अवॉर्ड २०२६’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.