भुसावळातील खून प्रकरणात अॅट्रॉसिटीचे कलम वाढवले; दोघांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ; २९ लाखांच्या उसनवारीच्या वादातून तरुणाची हत्या केल्याचा आरोप; तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गोपाळ नगर परिसरातील २१ वर्षीय भूषण उल्हास व्हावळे याच्या खूनप्रकरणाला आता अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमाची जोड देण्यात आली आहे. या प्रकरणातील अटकेतील संशयित संजय दत्तू आवटे आणि प्रमोद बलराम लाहोरीया या दोघांना न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिसरा संशयित रफिक मेमन उर्फ गुड्डू अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे, मयत भूषण याच्यावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनुसूचित जातीच्या तरुणाच्या खूनप्रकरणी अॅट्रॉसिटीचे कलम

भूषण व्हावळे हा अनुसूचित जातीतील असल्याने या प्रकरणात पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) कलम वाढविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या कलमामुळे पुढील तपासाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्याकडे आली आहे. शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात दोन्ही संशयितांना भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायमूर्ती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायासनासमोर हजर करण्यात आले.

संशयित प्रमोद लाहोरीया याची ओळख परेड बाकी असल्याने त्याला काळा गाऊन घालून न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे. तर संजय आवटे याची ओळख पटल्याने त्याला साध्या कपड्यांमध्ये न्यायालयात आणण्यात आले.

चार दिवसांच्या कोठडीची मागणी; न्यायालयाकडून तीन दिवसांची कोठडी

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. संशयितांनी साक्री फाटा परिसरातील फार्म हाऊसवर तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह वॉटर पार्कजवळ टाकण्यासाठी वाहनाचा वापर केल्याचा संशय असून, संबंधित वाहनाचा शोध घ्यायचा आहे. तसेच तरुणाला मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेला लाकडी दांडा आणि अन्य संभाव्य शस्त्रांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

याशिवाय, उसनवारीच्या पैशांच्या वादाव्यतिरिक्त खुनामागे अन्य काही कारण होते का, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी नमूद केले. सरकार पक्षातर्फे अॅड. मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली, तर संशयितांतर्फे अॅड. मनीष सेवलानी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयितांना १२ ऑक्टोबरपर्यंत, म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

३४ लाखांची उसनवारी; २९ लाखांवरून वाद

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, भूषण उल्हास व्हावळे याने ३४ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्यापैकी पाच लाख रुपये परत केले होते; मात्र उर्वरित २९ लाख रुपये परत न केल्याने वाद निर्माण झाला होता. या वादातून संशयितांनी भूषण याला भुसावळमधील साक्री फाटा परिसरातील संजय दत्तू आवटे यांच्या फार्म हाऊसवर नेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा भाऊ विशाल उल्हास व्हावळे यांनी फिर्यादीत केला आहे.

या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात संजय दत्तू आवटे, प्रमोद बलराम लाहोरीया आणि रफिक मेमन उर्फ गुड्डू यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी संजय आवटे आणि प्रमोद लाहोरीया यांना गुरुवारी दुपारी अटक केली होती. तिसरा संशयित गुड्डू अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

संशयित संजय आवटे यांचे राजकीय कुटुंबाशी नाते

या प्रकरणातील अटकेतील संशयित संजय आवटे हे भुसावळमधील भाजपचे नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे बंधू, तर माजी शिक्षण सभापती मंगला आवटे यांचे पती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खूनप्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भूषण व्हावळे याच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.