भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे जतन करून तिची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब, भुसावळतर्फे ९ सप्टेंबर रोजी मंगळागौरी प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. नवाशक्ती आर्केडमागील इनरव्हील क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भुसावळातील विविध महिला ग्रुप्सनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, नृत्यप्रकार तसेच सोलो परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. मंगळागौरी हा महिलांच्या पारंपरिक उत्साहासोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा उत्सव आहे. सुवासिनींकडून घराची सजावट, मंगळागौरीची पूजा, मेहंदी, गजरा आणि सोळा शृंगार करून फुगडी, रिंगण यांसह विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. पूर्वी घराच्या अंगणात महिलांचा हा उत्सव मोठ्या उत्साहात रंगत असे. मात्र, बदलती जीवनशैली आणि वाढती फ्लॅट संस्कृती यामुळे अंगणे कमी झाली असली तरी महिलांचा उत्साह आणि परंपरेशी असलेली नाळ कायम असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले. पूर्वी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ दादी, आई तसेच कुटुंबातील ज्येष्ठ महिलांकडून पुढील पिढीला शिकविले जात. आता तंत्रज्ञानाच्या युगात व्हिडिओच्या माध्यमातून नव्या पिढीतील महिला हे खेळ शिकत आहेत. उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागील भावना, संस्कृती आणि परंपरा जपण्याची ओढ कायम असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. कार्यक्रमात आयोजित मंगळागौरी स्पर्धेत शिवशक्ती ग्रुपने प्रथम, नेवे समाज ग्रुपने द्वितीय, आनंदी ग्रुपने तृतीय, तर श्रावणी ग्रुपने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सोलो परफॉर्मन्समध्ये स्वप्नाली घोडके यांना पुरस्कार देण्यात आला. दहीहंडीने वाढविला उत्साह जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात दहीहंडी उत्सवाचेही आयोजन करण्यात आले. बालगोपालांनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून जन्माष्टमीचा उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्मिता बियाणी होत्या. यावेळी IIW Treasurer डॉ. रश्मी शर्मा, रजनी सावकारे, मनीषा तायडे, कमल सचदेव, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सविता शुक्ला, सचिव वैशाली भगत, कल्चरल हेड शीतल भारदे, आयएसओ संगीता जाधवानी यांच्यासह शशि लाहोटी, स्वाती देव, रुचिका शर्मा, प्राची राणे, किरण शुक्ला, मनीषा वानखेडे, वंदिता पारे, वृषाली पाटील, राधिका लाहोटी, पद्मजा दरगड, डॉ. गौरी पाटील, डॉ. नीलिमा तळेले, पूजा फेगडे, अलका ढाके आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅडव्हायझरी कमल सचदेव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


