शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन; चारा छावण्या, गिरणा नदीचे आवर्तन व रब्बीसाठी पाच आवर्तनांची मागणी…

धरणगाव (प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतपिके करपण्यास सुरुवात झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याअभावी गुराढोरांचेही हाल होत असल्याने धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४ सप्टेंबर रोजी धरणगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतपिकांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व उद्विग्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून, प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच गिरणा नदीचे एक आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे आणि आगामी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर पाच आवर्तनांचे नियोजन जाहीर करावे, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
शासनाच्या निकषानुसार पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येतात. मात्र, धरणगाव तालुक्यात परिस्थिती गंभीर असतानाही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या दहा दिवसांत शासन-प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे, नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, सुनील चौधरी, किरण अग्निहोत्री, जितेंद्र धनगर, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी, तसेच लिलाधर पाटील, नंदू पाटील, अरुण पाटील, गजानन महाजन, सुनील चव्हाण, प्रविण पाटील, अक्षय मुथा, रियाझ बागवान, वसिम पिंजारी, प्रेमराज चौधरी, मेघनाथ ठाकरे, राकेश चौधरी, अरविंद चौधरी, शरद शिरसाठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.