जळगाव (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरीष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी दिले.
कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक लोक प्रतिनिधीं तसेच स्वयंसेवक यांचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकार्यांच्या समवेत आढावा बैठक पार पडली. यावेळी अलोने बोलत होते.
बैठकीस खासदार रक्षा खडसे, डॉ.एस.डी. खारपाडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप विभागीय अधिकारी दिपमाला चौरे, सीमा आहिरे, रामसिंग सुलाने, अजित थोरबोले, तुकाराम हुलवळे, इंडियन मेडीकल असोशियनचे पदाधिकारी डॉ.दिपक पाटील, स्नेहल फेगडे, डॉ.अजीत पाटील, डॉ. राधेशाम चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना समाधानकारक
केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. अलोने पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत, झोपडपट्टीचा भाग तसेच जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेष्ठ नागरीक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबतही कायम आढावा घेण्यात यावा, याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती येईल व स्वयंसेवक त्याच भागातील असल्याने तातडीने उपाययोजना करणे सुलभ होईल असे सांगतानाच पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येवून चाचण्यांचे निदान (स्वॅबचे रिपोर्ट) 24 तासात प्राप्त होतील अशा उपाययोजना कराव्यात. कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.


