भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच अनधिकृत तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागात तब्बल ३ लाख ५ हजार प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, त्यातून ३१ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत विनातिकीट व अनधिकृत तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधातील कारवाईत सुमारे ७ टक्क्यांची, तर दंडाच्या महसुलात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. भुसावळ विभागात दररोज सरासरी १३ हजार प्रवाशांवर कारवाई केली जात असून, त्यातून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. जुलै महिन्यात २० कोटींचा दंड जुलै २०२६ मध्ये मध्य रेल्वेने सुमारे २ लाख ६० हजार प्रवाशांवर कारवाई करून २० कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल केला. जुलै २०२५च्या तुलनेत यंदा दंडाच्या रकमेत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दंडाच्या किमान रकमेत २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आले असून, रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केल्यामुळे दंडाच्या महसुलात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईनंतर भुसावळ विभागाचा क्रमांक मध्य रेल्वेच्या विविध विभागांच्या तुलनेत कारवाई आणि दंडाच्या महसुलात मुंबई विभाग आघाडीवर आहे. त्यानंतर भुसावळ विभागाने दुसरे स्थान मिळवले आहे. रेल्वे प्रशासनाकडून विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी मोहीम सुरू असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


