भुसावळात १६ ऑगस्टला ‘लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल’ नाटिकेचे सादरीकरण ;

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम; स्थानिक कलावंतांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे यंदाही विशेष सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नाटिकेचे सादरीकरण रविवार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता संतोषी माता सभागृह, भुसावळ येथे करण्यात येणार आहे.

या नाटिकेच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना आपल्या अभिनयकौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग तसेच राष्ट्रनिर्मिती आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे प्रभावी दर्शन या नाटिकेतून घडणार आहे.

नव्या पिढीला मिळणार प्रेरणा

देशाच्या एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले कार्य आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच त्यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे कार्य नाट्यरूपातून मांडल्याने उपस्थितांना हा विषय अधिक प्रभावीपणे समजून घेता येणार आहे.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्यातून या नाटिकेचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाला त्यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

भुसावळकरांना उपस्थितीचे आवाहन

या प्रेरणादायी नाटिकेचा भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे तसेच मंडळाच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांनी केले आहे.