भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात असताना, यंदा प्रत्येक कुटुंबाने तिरंग्यासोबतच एक झाड लावून त्याचे संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागाला वंदन करून देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी देशात मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र असल्याने पर्यावरणाचा समतोलही मोठ्या प्रमाणात राखला गेला होता. स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलातील जवान जीवाची पर्वा न करता देशसेवा करीत आहेत. त्याचप्रमाणे देशातील पर्यावरणाचे रक्षण करणे, वृक्षतोडीमुळे कमी झालेले हरित क्षेत्र पुन्हा वाढविणे आणि निसर्गाचा समतोल राखणे हीदेखील प्रत्येक नागरिकाची सामुदायिक जबाबदारी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे हरित क्षेत्रात घट झाली असून त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. वाढते प्रदूषण, तापमानवाढ, अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच विविध पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मानवासह निसर्गातील सर्व सजीवांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ‘हरित भारत, समृद्ध भारत, प्रदूषणमुक्त भारत’ घडविण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाला प्रतिसाद देत, या पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लावावे. केवळ वृक्षारोपण न करता त्याचे नियमित संगोपन, संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी. हर घर तिरंग्यासोबत हर घर एक झाड, असा संकल्प करून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला आणि देशरक्षणासाठी कार्यरत जवानांच्या सेवेला खरी मानवंदना देऊया. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनात योगदान देत भावी पिढ्यांसाठी हिरवाईने नटलेला, समृद्ध आणि प्रदूषणमुक्त भारत घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले.


