भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘अमृत’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना पुन्हा गती मिळाली आहे. आठवडी बाजार परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाचे भूमिपूजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाल्यास वर्षभरात भुसावळकरांना ‘अमृत’ योजनेचे पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री सावकारे यांनी व्यक्त केला. ‘अमृत-१’ योजनेच्या कामादरम्यान कंत्राटदारासोबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामाला अपेक्षित वेग मिळत नव्हता. मात्र, नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या अडचणींवर सकारात्मक तोडगा काढण्यात आल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले. त्यामुळे रखडलेल्या कामांना पुन्हा चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘अमृत-२’मध्ये जलशुद्धीकरण केंद्रासह विविध कामे भुसावळ शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत-२’ योजनेतील कामांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली होती. या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, शहरातील उर्वरित भागात पाणीपुरवठा वाहिन्या टाकणे, नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल उभारणे तसेच आठवडी बाजार परिसरात जलकुंभ उभारणे, या प्रमुख कामांचा समावेश आहे. शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी एकूण ११ जलकुंभांची योजना आखण्यात आली आहे. त्यापैकी १० जलकुंभ ‘अमृत-१’ योजनेत, तर उर्वरित एका जलकुंभाचा समावेश ‘अमृत-२’मध्ये करण्यात आला आहे. आठवडी बाजार परिसरातील जलकुंभ पूर्ण झाल्यानंतर संबंधित परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. सत्ताबदलानंतर कामाला पुन्हा मिळाली गती नगरपालिकेतील सत्ताबदलानंतर आठवडी बाजार परिसरातील जलकुंभाच्या कामाला काही काळ स्थगिती देण्यात आली होती. मात्र, प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा आढावा घेतला आणि त्याला पुन्हा हिरवा कंदील दिला. त्यानंतर जलकुंभाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. भुसावळ शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ‘अमृत’ योजनेची उर्वरित कामे वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. योजनेतील कामांना गती देऊन नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती भूमिपूजन कार्यक्रमास प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, भाजपा गटनेते युवराज लोणारी, पाणीपुरवठा समिती सभापती महिमा नागराणी, शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा इंगळे, आरोग्य समिती सभापती मेघा वाणी, उद्योजक मनोज बियाणी, सीमा नरवाडे, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, सुजित भोळे, महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते, प्राची पाटील, डॉ. छाया फालक-देशमुख, सोनम इंगळे यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


