भुसावळ (प्रतिनिधी )- भारताचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, अखंडता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर हुतात्मे, शहीद, स्वातंत्र्यसैनिक आणि वीर जवान यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ‘शहीद परिवार माझा परिवार’ हा राष्ट्रीय स्तरावरील कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी. जावळे (भुसावळ, जि. जळगाव) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती, भारत सरकार यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्याची संकल्पना मांडली आहे. केवळ श्रद्धांजली नको; कुटुंबांची जबाबदारीही घ्या! दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कुटुंबीयांची सद्यस्थिती काय आहे, त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू आहे का, उदरनिर्वाहाची परिस्थिती कशी आहे, रोजगाराची गरज आहे का, आरोग्याच्या समस्या आहेत का आणि शासनाच्या सर्व पात्र योजनांचा लाभ मिळतो आहे का, याचा दरवर्षी प्रत्यक्ष आढावा शासनाने घ्यावा, अशी मागणी जावळे यांनी केली आहे. ‘एक शहीद परिवार – एक नोडल अधिकारी’ प्रत्येक शहीद कुटुंबासाठी संबंधित प्रशासनाकडून एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावा. हा अधिकारी कुटुंबाशी नियमित संपर्क ठेवून त्यांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवेल तसेच त्यांचे कालबद्ध निराकरण होण्यासाठी पाठपुरावा करेल, अशी संकल्पना निवेदनात मांडण्यात आली आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ‘शहीद परिवार संवाद दिवस’ या दोन्ही राष्ट्रीय दिवसांच्या निमित्ताने शहीद परिवारांचे सामूहिक परिवार मिलन, सन्मान आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. कुटुंबीयांनी आपल्या समस्या, अनुभव व सूचना थेट शासनाच्या प्रतिनिधींसमोर मांडाव्यात आणि त्यावर पुढील कार्यवाहीचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनावर भर शहीद परिवारातील मुलांच्या शिक्षण, उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकासासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. तसेच कुटुंबातील रोजगारक्षम सदस्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात ‘शहीद परिवार हेल्पडेस्क’ स्थापन करून विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी प्रभावी समन्वय व्यवस्था निर्माण करण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘ज्यांनी देशासाठी प्राण दिले, त्यांच्या परिवाराची जबाबदारी राष्ट्राची!’ शिशिर डी. जावळे म्हणाले, “शहीदांना वर्षातून दोन दिवस श्रद्धांजली वाहणे पुरेसे नाही. ज्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्राची साथ वर्षभर जाणवली पाहिजे. हा केवळ शासकीय उपक्रम नसून राष्ट्राच्या कृतज्ञतेची कायमस्वरूपी परंपरा बनली पाहिजे.” निवेदनाच्या शेवटी देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्मे व शहीदांच्या त्यागाची आठवण करून देत, ‘शहीद परिवार माझा परिवार’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून कार्यसिद्धीस नेण्याचे भावनिक आवाहन राष्ट्रपतींकडे करण्यात आले आहे.


