भुसावळ ( प्रतिनिधी)- भुसावळ येथे आज (दि. ६ ऑगस्ट २०२६) मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ उपविभागातील विविध विभागांची 'जनसमाधान' उपक्रमांतर्गत आढावा बैठक पार पडली. बैठकीस भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार निता लबडे यांचेसह उपविभागातील सर्व संबंधित विभागांचे कार्यालय प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकी दरम्यान विविध विभागांशी संबंधित नागरिकांकडून एकूण ४० अर्ज व तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व अर्जांची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागप्रमुखांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्राप्त झालेल्या सर्व ४० अर्जांवर पुढील ८ दिवसांच्या आत नियमानुसार व योग्य ती कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावावेत. ज्या प्रकरणांमध्ये तांत्रिक किंवा धोरणात्मक अडचणी असतील, त्या प्रकरणांमध्ये विलंब न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन आवश्यक प्रस्ताव तयार करून तातडीने पाठवावेत. नागरिकांच्या अर्जांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी. प्रत्येक अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित अर्जदाराला स्वतंत्रपणे कळवावी तसेच सर्व कार्यवाहीचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. आदी प्रमुख सूचनासह जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि प्रभावी निराकरण करण्यावर भर देत प्रशासनाने उत्तरदायी व लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचे निर्देश यावेळी दिले. या बैठकीस महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



