वृक्षलागवडीबरोबर वृक्षांचे संरक्षण व संगोपनही गरजेचे: शालेय प्रार्थनेत ‘वृक्षप्रतिज्ञे’चा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांप्रती आदर निर्माण होईल — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड तसेच वन व जंगल क्षेत्रात सातत्याने होत असलेली घट यामुळे हरित क्षेत्र कमी होत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम पर्यावरणावर होत असून वातावरणातील प्रदूषण वाढत आहे. परिणामी ढगफुटीसदृश पाऊस, चक्रीवादळे, भूकंप, विविध दुर्धर आजार यांसारख्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मानवासह निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीसोबत वृक्षांचे संरक्षण व संगोपन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले.

देश ‘हरित भारत, समृद्ध भारत व प्रदूषणमुक्त भारत’ बनविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात असून यंदाही वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय कार्यालयांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत नाममात्र दरात वृक्षरोपे उपलब्ध करण्यात आली असून विविध संस्था व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांविषयी प्रेम, आपुलकी व जबाबदारीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. निरोगी व सुरक्षित जीवनासाठी वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहानपणापासून समजावे, यासाठी शालेय स्तरावर नियमित प्रार्थनेबरोबर ‘वृक्षप्रतिज्ञे’चा समावेश करण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांप्रती आदर निर्माण होईल आणि वृक्षलागवडीबरोबरच त्यांच्या संगोपन व संरक्षणाची सवयही विकसित होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

तसेच शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांमध्ये होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमांबरोबर वृक्षप्रतिज्ञा घेण्यात यावी. सामुदायिक वृक्षारोपणाच्या वेळीही वृक्षसंवर्धनाची शपथ घेतल्यास लावलेल्या वृक्षांचे दीर्घकाळ संरक्षण व संगोपन होण्यास मोठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

— डॉ. सुरेंद्रसिंग पाटील
संचालक, पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र