व शिस्तबद्ध प्रवासासाठी दंडात वाढ; प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करण्याचे मध्य रेल्वेचे आवाहन भुसावळ (प्रतिनिधी: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुखकर करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील विविध महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. धूम्रपान, मद्यपान करून उपद्रव करणे, अनधिकृत प्रवेश, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे, अनधिकृत फेरीवाला व्यवसाय तसेच इतर असुरक्षित कृतींविरोधात कडक प्रतिबंध आणि जलद निवारण सुनिश्चित करणे, हा या सुधारणांचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. धूम्रपानासाठी २ हजार रुपयांपर्यंत दंड सुधारित कलम १६७ नुसार रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास आता २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. संबंधित व्यक्तीचा पास किंवा तिकीट जप्त करून त्याला रेल्वे आवारातून बाहेर काढण्याची तरतूदही करण्यात आली आहे. दंड भरण्यास अपयशी ठरल्यास न्यायालयाकडून ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. मद्यपान करून उपद्रव केल्यास कारवाई कलम १४५ अंतर्गत रेल्वे परिसरात मद्यपान करून उपद्रव निर्माण करणाऱ्यांवर रेल्वे आवारातून बाहेर काढणे, पास किंवा तिकीट जप्त करणे, २४ तासांपर्यंत साधा कारावास, १ हजार रुपयांपर्यंत दंड, दोन्ही शिक्षा किंवा सामुदायिक सेवा अशी कारवाई होऊ शकते. सतत उपद्रव निर्माण करणाऱ्यांना ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही तरतूद भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांशी सुसंगत करण्यात आली आहे. अनधिकृत प्रवेशावर कठोर निर्बंध सुधारित कलम १४७ नुसार प्रवासी क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करून जागा सोडण्यास नकार दिल्यास ५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशा प्रकरणांत किमान २ हजार रुपये दंडाची तरतूद असून, प्रथम संबंधित व्यक्तीला ताकीद दिली जाईल. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा केल्यास शिक्षा कलम १४६ अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास, २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही तरतूद भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमाशी सुसंगत करण्यात आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुधारित कलम १४४ नुसार अनधिकृत फेरीवाला व्यवसायाच्या पहिल्या तीन उल्लंघनांसाठी प्रत्येक वेळी २ हजार रुपये दंड आकारला जाईल. दंड न भरल्यास न्यायालयाकडून ३ महिन्यांपर्यंत कारावास, ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. चौथ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी १ वर्षापर्यंत कारावास आणि ५ हजार रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. वारंवार नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. मात्र, जन विश्वास कायदा, २०२३ अंतर्गत भिक्षा मागणे हा गुन्हा मानण्याची पूर्वीची तरतूद रद्द करण्यात आली आहे. आक्षेपार्ह वस्तू बेकायदेशीरपणे आणल्यास किमान १० हजारांचा दंड कलम १६५ अंतर्गत रेल्वे परिसरात आक्षेपार्ह वस्तू बेकायदेशीरपणे आणल्यास आता किमान १० हजार रुपये दंड, संबंधित वस्तू काढून टाकणे तसेच झालेल्या नुकसानाची जबाबदारी अशी कारवाई करण्यात येईल. दंड भरण्यास नकार दिल्यास न्यायालयाकडून १ वर्षापर्यंत कारावास किंवा किमान १० हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा सुनावली जाऊ शकते. प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन मध्य रेल्वेने सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित तरतुदींची माहिती करून घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट किंवा पाससह प्रवास करावा, आरक्षित जागांचा आदर करावा, रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश, धूम्रपान आणि अनधिकृत फेरीवाला व्यवसाय टाळावा तसेच सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.


