पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल : जखमी मंगेश काळे यांच्यावर रॉड, लाठ्या व हॉकी स्टिकने हल्ला; कट्टा दाखवून पत्नीला धमकी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील व्हीआयपी कॉलनी परिसरात २९ मे रोजी रात्री घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात भुसावळ शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश अंबादास काळे (वय २६, रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) हे पत्नी पायल यांच्यासह राहतात. २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजता ते पत्नीसमवेत घराच्या छतावर झोपले असताना आरोपी कुंदन पठाडे, रोहित नवगिरे उर्फ दादू, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट, अंकित व भावेश हे तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत मंगेश काळे यांच्यावर हल्ला चढविला.

फिर्यादीनुसार, कुंदन पठाडे याने लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित नवगिरे याने लाकडी दांड्याने, तर विशाल गेंगाट याने हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. पत्नी पायल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जीव वाचवण्यासाठी मंगेश काळे यांनी छतावरून खाली उडी मारून पळ काढला. मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा रॉड, लाठ्या आणि हॉकी स्टिकने मारहाण केली. यावेळी कुंदन पठाडे याने चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करताना मंगेश यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले, तसेच उजव्या हातालाही जखमा झाल्या.

दरम्यान, फिर्यादीनुसार बाबा गेंगाट याने मंगेश यांच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवत कोणाला फोन केल्यास गोळी घालण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पायल काळे यांनी घरात जाऊन दरवाजा बंद केला आणि पोलिसांच्या ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधला. तसेच मित्र आकाश पारधे व कुणाल सोनवणे यांनाही घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी नागरिक जमा होऊ लागल्याने सर्व आरोपी तेथून पसार झाले. जखमी मंगेश काळे यांना मित्रांच्या मदतीने प्रथम भुसावळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध मारहाण, जीवघेणा हल्ला, धमकी तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. डीवायएसपी केदार बारबोले यांनी या घटनेमागे पूर्ववैमनस्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उपचारासाठी मुंबई येथे दाखल असलेले मंगेश काळे यांचे निधन झाल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे. मात्र पोलिसांकडे याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.