भुसावळच्या बडा हनुमान मंदिरात 121 व्या सप्ताहानिमित्त आम्र महोत्सव; 201 किलो आंब्यांचा नैवेद्य

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील प्रसिद्ध बडा हनुमान मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह शनिवारी (दि.16) मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिरात विशेष आम्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मजागृती आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमात दर शनिवारी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाते. विशेष 121 व्या सप्ताहानिमित्त हनुमानजींना तब्बल 201 किलो आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.

यावेळी भाविकांसाठी आंबा प्रसाद, बुंदी, खिचडी-भात तसेच केळींच्या प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमास सुरुवात होणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा व आम्र महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिरातर्फे वैष्णव परिवार व भक्त परिवाराने केले आहे.