भुसावळ विभागातील २४ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न : “ सावधान सीनियर्स” या माहितीपत्रिकेचे प्रकाशन

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आज दि. ३० मार्च २०२६ रोजी मंडल रेल प्रबंधक कार्यालयातील वसुधरा सभागृहात एक औपचारिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

दीर्घकाळ रेल्वे सेवेत कार्यरत राहिल्यानंतर दिनांक ३० मार्च २०२६ रोजी भुसावळ विभागातील एकूण २४ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रशासनामार्फत तत्काळ एकूण रुपये ८ कोटी ५७ लाख ५८ हजार १५० इतकी सेवानिवृत्ती लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या दीर्घ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते पीपीओ (Pension Payment Order) चे वितरण करण्यात आले.

वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री. दिलीप आर. खरात यांनी उपस्थितांना संबोधित करत सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याबाबत मार्गदर्शन केले व सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन सुरक्षेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “ सावधान सीनियर्स” या माहितीपत्रिकेचे प्रकाशन श्री. पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या पत्रिकेमध्ये सध्या वाढत्या सायबर व ऑनलाईन फसवणुकीबाबत उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे. या उपक्रमामुळे सेवानिवृत्त पेन्शनधारकांना निश्चितच लाभ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेटलमेंट व कार्मिक विभागातील सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.