पोलिस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याची धरली कॉलर ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल :

फैजपूर (प्रतिनिधी) – फैजपूर येथील पोलिस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण प्रमोद भिरूड (वय २६) आणि धीरज विजय सोनवणे (वय २५, दोघे रा. फैजपूर) हे गुटखा खात पोलिस ठाण्यातील अंमलदाराच्या कक्षात गेले होते. यावेळी त्यांनी तेथेच गुटखा थुंकल्याने उपस्थित पोलिसांनी त्यांना जाब विचारला असता या कारणावरून दोघांनी संताप व्यक्त करत वाद घातला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले असून, त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याच्याशी गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.या घटनेमुळे पोलिस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हवालदार रुपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहेत.