पेट्रोल टंचाईची अफवा; जळगाव इंधनासाठी पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी : अफवांवर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन;

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण देत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले की, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याने अशा माहितीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच भीतीपोटी इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि वाहतूक कोंडी टाळावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अधिकृत शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना शांतता, संयम आणि सहकार्य राखण्याचे आवाहन करत कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.