जळगाव (प्रतिनिधी ) – शहरात खुनांची मालिका सुरू असल्याची चर्चा असतानाच पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ लाँड्री व्यावसायिकाचा दगड मारून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) असे असून ते लाँड्री व्यवसाय करत होते. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे घराबाहेर गेले होते; मात्र ते परतले नाहीत. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा मृतदेह खंडेराव नगर परिसरातील रेल्वे रुळाजवळ आढळून आला. सुरुवातीला ही रेल्वे अपघाताची घटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
मात्र रामानंद नगर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री दोन संशयित रेल्वे रुळाजवळ सिगारेट ओढत बसले होते. त्यावेळी अमर सपकाळे तेथे आले. ते मद्यधुंद अवस्थेत होते. काही कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून शिवीगाळ झाली. याच रागातून दोन्ही संशयितांनी सपकाळे यांच्या डोक्यात मोठा दगड मारून त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्र जेक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.


