चोपडा – चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटी वाटपाच्या वादातून तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात घडली असून दोन्ही कर्मचारी जखमी झाले आहेत.
जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी आहेत. हाणामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेपूर्वी दोघांची हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात अचानक भेट झाली. यावेळी आधीपासून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. ड्युटी वाटप, हजेरी नोंद तसेच अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वैमनस्य होते. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.


