भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात आज १५ रोजी शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळ दुपारी १२ वाजता भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन करून ती जाळत निषेध नोंदवला.

भाजपाच्या म्हणण्यानुसार, सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले तसेच त्यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केली. ही तुलना अयोग्य असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या दालनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा हटवून त्या ठिकाणी टिपू सुलतान यांची प्रतिमा लावल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निषेध सुरू असल्याचेही भाजपाकडून सांगण्यात आले.
भाजपा नगरपालिकेचे गटनेते युवराज लोणारी यांनी काँग्रेस पक्षावर मतांसाठी बेगडी भूमिका घेतल्याचा आरोप करत सपकाळ यांनी शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
या आंदोलनात उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, मनोज बियाणी, राजेंद्र आवटे, ॲड. बोधराज चौधरी, सोनाली महाजन, पूजा तायडे, सीमा नरवाडे, अनिता आंबेकर, शैलेजा पाटील, पवन बुंदेले, पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


