जळगाव – जळगाव ते संभाजीनगर दरम्यान धावत्या बसमध्ये प्रवास करत असताना एका महिलेच्या पिशवीला धारदार वस्तूने कापून सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता अशोक बारी या पाळधी येथे लग्न समारंभासाठी जात होत्या. त्या जळगावहून बसने संभाजीनगरकडे प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कापडी पिशवीवर डल्ला मारला. चोरट्याने धारदार वस्तूने पिशवी कापून त्यातील सुमारे ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही बाब लक्षात येताच संबंधित महिलेकडून जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हवालदार भटू पाटील करत आहेत.
दरम्यान, धावत्या बसमध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने प्रवाशांनी मौल्यवान वस्तूंबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



