भुसावळात पद्मावतीनगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा साेहळा १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत -तीन दिवस रात्री रंगणार किर्तन, शेवटच्या दिवशी महाप्रसाद

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील वरणगाव राेडवरील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावती नगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा साेहळा १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस आयाेजित केला आहे. त्यात तिन्ही दिवस रात्री किर्तन हाेईल. गेल्या चार दिवसांपासून कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. मंदिराची रंगरंगाेटी व सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पद्मावती नगरात पांडुरंग ओंकार पाटील व अलका पांडुरंग पाटील या दांपत्याने स्वखर्चाने कुलस्वामिनी बिजासनी मातेचे मंदिर उभारले आहे. तेथील मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस हाेणार आहे. त्यात १९ राेजी रात्री ८ वाजता गाेपाळ महाराज यांचे हरिकिर्तन हाेईल. ‘परमार्थ आणि समाजाची वास्तव स्थिती’ असे विषय घेऊन ते मांडणी करतील. २० राेजी सकाळी बिजासनी मातेच्या मूर्तीची पद्मावतीनगर परिसरातून मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर हाेमपूजा आणि धार्मिक विधी हाेईल. रात्री ८ वाजता महिला किर्तनकार राधाताई भाेलाणकर यांच्या किर्तनाचे आयाेजन करण्यात आले आहे. २१ राेजी सकाळी ७ वाजेपासून अभिषेक पूजा, मूर्तीची स्थापना केली जाईल. दुपारी महाप्रासादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रात्री ८ वाजता राजेंद्र महाराज यांचे किर्तन हाेईल. त्यांना गायनाचार्य रामकृष्ण महाराज, मृदंगाचार्य हर्षल महाराज हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पांडुरंग पाटील, अलका पाटील, पवन पाटील यांच्यासह आयाेजकांनी केले आहे.