भुसावळ (प्रतिनिधी ) –

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान, महिलांविषयी अत्यंत अश्लील व लज्जास्पद वक्तव्ये तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण भास्कर पाटील याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. आरोपीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपी भूषण भास्कर पाटील (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याने ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फेसबुक लाईव्हद्वारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत नीच आणि अर्वाच्य भाषेत वक्तव्ये केली. तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची जाहीर धमकी देत कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या असून, कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान दिले आहे.
आरोपीने महापुरुषांचाच नव्हे, तर महिलांविषयीही अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद भाषेत टिप्पणी केली आहे. तसेच राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याच्यावर तात्काळ ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीचे फेसबुक अकाउंट कायमस्वरूपी ब्लॉक करण्यासाठी सायबर सेलकडून तातडीने कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, असेही रिपब्लिकन सेनेचे म्हणणे आहे.
प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन दिवसांच्या आत आरोपीला अटक करावी, अन्यथा रिपब्लिकन सेना व सर्व समाज बांधव जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे, राजश्रीताई सोनवणे, बंटी नरवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


