जळगाव ( प्रतिनिधी ) –
झेलम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतील मौल्यवान दागिन्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर, अल्फरा मशीदजवळ, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार सोनू जयसिंग बागडे हा अद्याप फरार आहे.
दि. 8 फेब्रुवारी रोजी जळगाव ते भुसावळ दरम्यान झेलम एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून सुमारे 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी इटारसी रेल्वे पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
या चोरीप्रकरणी जळगाव पोलीस दप्तरी नोंद असलेले गुन्हेगार समीर शेख उर्फ गोल्डन आणि त्याचा साथीदार सोनू बागडे यांचा सहभाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत समीर शेख यास ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या समीर शेख यास पुढील तपासासाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपी सोनू बागडे याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंद्र कापडणे आदींनी केली.



