भुसावळ विभागाची विनातिकीट प्रवाशांविरोधात कठोर कारवाई : 8.18 लाख प्रकरणांतून 68.86 कोटी रुपयांचा दंड वसूल :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ रेल्वे विभागाने अनधिकृत व विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात राबवलेल्या कठोर कारवाईत आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल 2025 ते जानेवारी 2026) या कालावधीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या कालावधीत विनातिकीट, अयोग्य अथवा अवैध प्रवास करणाऱ्या तब्बल 8.18 लाख प्रवाशांकडून 68.86 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

भुसावळ विभाग आपल्या सन्माननीय प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असून, अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र आणि नियोजनबद्ध करण्यात आल्या आहेत.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ही संख्या 5.82 लाख होती. त्या तुलनेत यावर्षी सुमारे 40 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

दंड वसुलीच्या बाबतीतही मोठी वाढ दिसून आली असून, 2024-25 मध्ये 42.87 कोटी रुपये दंड वसूल झाला होता. त्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात 61 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

भुसावळ विभागाने अनधिकृत प्रवास ओळखण्यासाठी बहुसूत्री धोरण अवलंबले आहे. यामध्ये स्थानक तपासणी, अचानक तपासणी, किल्ला पद्धतीची (फोर्ट्रेस) तपासणी, सखोल तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा समावेश आहे. या मोहिमा मेल/एक्सप्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे राबवण्यात येत आहेत.

भुसावळ रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग काउंटर, एटीव्हीएम, रेलवन ॲप किंवा IRCTC संकेतस्थळावरूनच वैध तिकीट खरेदी करून प्रवास करावा.
गैरसोय व दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करावा, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.