काहूरखेडे जि.प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहातविद्यार्थ्यांनी शिकत-शिकत घेतले व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष धडे :


भुसावळ (प्रतिनिधी ) – काहूरखेडे ता. भुसावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व उपयुक्त वस्तूंचे स्टॉल लावून आपल्या कौशल्यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सदस्य लतिका झांबरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, उपशिक्षक समाधान जाधव, उपशिक्षिका ममता तडवी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ तसेच माध्यमिक विद्यालय बोहर्डी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले चाट, फरसाण, मिठाई, थंड पेये तसेच हस्तकला साहित्य विक्रीस ठेवले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, स्वच्छता, संघभावना व आत्मविश्वास यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांचे स्टॉल उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका ममता तडवी व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची गोडी निर्माण होऊन शालेय शिक्षणासोबत जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याचा उद्देश सफल झाल्याचे मत उपशिक्षक समाधान जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालकवर्ग व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.