एरंडोल (जि. जळगाव) :
एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून साधारण ३० वर्षीय महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवार, ४ तारखेला ही घटना उघडकीस आली असून त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात बुधवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. जंगलात संशयास्पद मृतदेह दिसल्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
मयत महिलेचा कंबरेपासून वरचा भाग पूर्णतः जळालेला असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. प्राथमिक पाहणीत हा खून सुमारे दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी पाहणी करताना बिअरची बाटली आढळून आल्याने मारेकऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत हा गुन्हा केल्याची किंवा महिलेला गुंगीचे पेय देऊन तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुराव्यांची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यातील बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासून मयत महिलेची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास करण्यात येत आहे.



