भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणुकीबरोबरच तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकणे, तिचा पाठलाग करणे, घरात घुसून चाकूचा धाक दाखवत विनयभंग करणे तसेच अश्लील फोटो मॉर्फ करून बदनामीची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
या प्रकरणी सिद्धान्त मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी व आरोपी यांची ओळख असल्याचा फायदा घेत आरोपीने शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पीडितेच्या डिमॅट अकाउंटची माहिती मिळवून तसेच तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून सुमारे १० लाख रुपये लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आर्थिक फसवणुकीनंतर आरोपीने तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने मुंबई ते मंगळूरपर्यंत तिचा पाठलाग केला. तसेच पीडितेच्या घरात घुसून तोंड दाबून चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला व तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून ते इंटरनेटवर अपलोड करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपवरून सतत संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हे फोटो व डेटा डिलीट करण्यासाठी आरोपीने पुन्हा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



