नेत्ररुग्णांसाठी आमदार अमोल जावळेंचा सातत्यपूर्ण प्रयत्न : रावेरमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : १४८ रुग्णांची तपासणी, ५५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड :

रावेर (प्रतिनिधी ) – ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून रावेर येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून एकूण १४८ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास आढळलेल्या ५५ पात्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना जळगाव येथे ने-आण करण्याची तसेच प्रवासासह इतर अनुषंगिक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे. निवड झालेल्या रुग्णांवर दि. ९ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे पूर्णतः विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील यांनी केले.

या शिबिरप्रसंगी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, नगराध्यक्षा संगीता महाजन, डॉ. वैभव गिरी, रविंद्र पाटील, ॲड. सूर्यकांत देशमुख, भास्कर महाजन, सी.एस. पाटील, पी.के. महाजन, अमोल पाटील, राजेश शिंदे, डॉ. दीपक सोलंकी, लखन महाजन, संदीप महाजन, बाळा आमोदकर, योगेश महाजन, पवन चौधरी, राजू सुवर्ण, मेहमूद भाई, राजू यवतकर, भूषण महाजन, निलेश बारी, निलेश पाटील, अनंत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ. तुषार जोशी, डॉ. कल्पेश पाटील आणि डॉ. अनंत लांडगे यांनी आपली मोलाची सेवा दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

“ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा वेळेत आणि दर्जेदार मिळणे ही आमची जबाबदारी आहे. डोळ्यांचे आजार, विशेषतः मोतीबिंदू, वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे रावेरसारख्या ग्रामीण भागात तपासणी शिबिरे आयोजित करून रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी अशाच उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.” : आमदार अमोल जावळे