भुसावळ (प्रतिनिधी ) – शिंदी, ता. भुसावळ येथील श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये दहावीच्या (एसएससी) विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ तसेच वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कोल्हे होते. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण नेमाडे, सचिव सुभाष कोल्हे तसेच विश्वस्त ऋषिकेश महाजन, शरद ढाके व महेंद्र कोल्हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व ईशस्तवनाने झाली. इयत्ता दहावीतील कु. हिमानी कोळी, कु. पूर्वा कोल्हे, कु. पूजा चौधरी, कु. साक्षी पाटील, तेजस पाटील, प्रथमेश पाटील व देवेश रायमले आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
मुख्याध्यापक बी. पी. वारके यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेचा योग्य उपयोग करून अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला. वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
मागील वर्षी दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. प्रतिक्षा जाधव, द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे प्रसाद चौधरी व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या कु. प्रिया सुरवाडे यांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी दहावीच्या वर्गातर्फे शाळेस आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जी. जी. राजपूत व एम. एस. महाजन यांनी केले, तर आभार आर. डी. महाजन यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



