भुसावळ (प्रतिनिधी)- देशाच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प हा रविवारी संसदेत सादर केला गेला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे देशभरातील सर्व घटकांचे लक्ष लागल होत. निर्मला सीतारमण या नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला असून आजच्या बजेटमध्ये त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा , हा अर्थसंकल्प, सर्वसामान्य, शेतकरी, नोकरदार, उद्योगजगत स्टार्ट्सअपसह विविध क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत नागरिकांनी सातपुडाकन्या ला दिलेल्या प्रतिक्रिया जाणून. घ्या…!

भुसावळ -२०२६–२७ चा अर्थसंकल्प तंत्रज्ञान व महिला शिक्षणाला चालना देणारा – ॲड. जास्वंदी भंडारी पाटील
२०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा तंत्रज्ञानावर विशेष भर देणारा असून ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला अधिक बळ देणारा आहे. यासाठी २००० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. कर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आणि ₹७५,००० मानक वजावटीमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळतो. मागील वर्षी सात लाखांवरून बारा लाखांपर्यंत ही मर्यादा वाढवण्यात आली होती आणि यावर्षी छोट्या करदात्यांसाठी करप्रणाली अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आलेला दिसतो. या अर्थसंकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे स्थापन करण्याची घोषणा. सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत, विशेषतः मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह आहे.एकूणच हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारा, सर्वसमावेशक आणि सकारात्मक दिशेने नेणारा आहे.
— ॲड. जास्वंदी भंडारी पाटील
(नोटरी वकील व सामाजिक कार्यकर्ती)



