भुसावळ विभागाची विशेष “फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम”; 683 प्रकरणांवर कारवाई,4.71 लाख रुपयांचा दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तसेच विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 17 जून 2026 रोजी विशेष “फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 683 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून 4 लाख 71 हजार 245 रुपये दंड वसूल करण्यात आला.

ही विशेष मोहीम भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या विभागातील आठ प्रमुख स्थानकांवर एकाचवेळी राबविण्यात आली. प्रवाशांना वैध तिकीट घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे आणि अनधिकृत प्रवासाला आळा घालणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

सघन तपासणी मोहिमेत मुख्य वाणिज्य निरीक्षक, मुख्य तिकीट निरीक्षक, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक तसेच वाणिज्य विभागातील कर्मचारी मिळून 57 कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे 8 कर्मचारी सहभागी झाले होते.

मोहिमेदरम्यान रेल्वे अधिनियमाच्या कलम 145(ब) अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 21 प्रकरणांमध्ये कारवाई करून 3,300 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या 4 विक्रेत्यांविरुद्धही नियमानुसार कारवाई करून त्यांच्याविरुद्ध प्रकरणे नोंदविण्यात आली.

भुसावळ रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी वैध तिकीट घेऊन व रेल्वे नियमांचे पालन करून जबाबदारीने प्रवास करावा. यामुळे गैरसोय, दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर अडचणी टाळता येतील.