भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील नगरपालिका संचलित पीएम श्री द.शी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतीच इको क्लब मंचाची स्थापना व उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या मंचाची स्थापना करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य एस. ए. मंदवाडे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. इको क्लब मंचासाठी आवश्यक साहित्याचे अर्पण व पूजन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती के. सी. चौधरी मॅडम व इतर शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, वाढते प्रदूषण, हवामान बदल तसेच ‘मिशन LiFE – पर्यावरणपूरक जीवनशैली’ या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने “नो व्हेईकल डे” साजरा करण्यात आला. दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात व प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा, असे आवाहन करण्यात आले. शालेय प्रांगणात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना रोपटे दत्तक देण्यात आली.
या इको क्लब मंचाच्या माध्यमातून वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त अभियान, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता अभियान तसेच विविध पर्यावरणविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



