भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, येथील तिर्थराज मंगेश पाटील याने आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वविक्रमात सहभाग नोंदवत शहराचा नावलौकिक वाढवला आहे.

२६ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा स्टेडियममध्ये एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड USA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य विश्वविक्रम उपक्रमात तिर्थराजने सहभाग घेतला. या उपक्रमाचे मुख्य आयोजक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व रेकॉर्ड ऑफिशियल भिकन अंबे आणि राधिका अंबे होते.
या उपक्रमात सहभागी स्केटर्सनी सायंकाळी ५ ते ६:३० या कालावधीत सलग १ तास २६ मिनिटे २६ सेकंद नॉन-स्टॉप स्केटिंग करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये, जिल्हे व शहरांमधून एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात आला असून, तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या विश्वविक्रमात सहभाग घेतला.
या ऐतिहासिक विश्वविक्रमात भुसावळ येथील एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल व सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी तिर्थराज मंगेश पाटील याने यशस्वी सहभाग नोंदवला. विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर तिर्थराजला एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड USA कडून अधिकृत विश्वविक्रम पदक प्रदान करण्यात आले असून, लवकरच त्याला अधिकृत प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात येणार आहेत.
तिर्थराजच्या या यशाबद्दल आमदार राजुमामा भोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आमदार अमोलभाऊ जावळे यांच्यासह विविध शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्था व मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उल्लेखनीय यशामुळे तिर्थराजच्या घरी तसेच नातेवाईक व मित्रपरिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


