भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालुक्यातील साकरी येथे दोन अल्पवयीन मुलींच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी बोलताना सौ. नंदाताई निकम यांनी या अमानुष हत्याकांडास जबाबदार असलेल्या आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. संशयित आरोपी अल्पवयीन असला तरी त्याने केलेले कृत्य अत्यंत गंभीर व अमानवी स्वरूपाचे असून हे सरळसरळ खुनाचे प्रकरण आहे. त्यामुळे वयाचा आधार घेऊन आरोपीस पाठीशी घालू नये, असेही त्या म्हणाल्या.
पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी शक्य तेवढा पाठपुरावा करण्यात येईल, तसेच या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा यासाठी शिवसेना सातत्याने आवाज उठवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
याप्रसंगी शिवसेना माजी आमदार दिलीपभाऊ भोळे, समाजसेवक श्री. प्रकाशभाऊ निकम, सुरेश कोल्हे, आनंद नरवाडे, इशा शेख, गोलू शाह, अतुल भारंबे, अमिता भैसारे, ज्योती तायडे, कल्पना महाजन, सविता चौधरी, मनीषा यादव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



