भुसावळ (प्रतिनिधी) – साकरी, ता. भुसावळ येथे 27 जानेवारी 2026 रोजी घडलेली दोन अल्पवयीन मुलींच्या निघृण हत्येची घटना अत्यंत धक्कादायक, अमानुष व समाजाला हादरवून टाकणारी असल्याचे मत प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा, त्यात फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मंडळाने उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दोन निष्पाप अल्पवयीन मुलींना जाणिवपूर्वक विहिरीत ढकलून निर्घृणपणे ठार मारण्यात आल्याची घटना संपूर्ण समाजाला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे परिसरात भीती, अस्वस्थता व तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांमध्ये, मुलींमध्ये व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
महिला मंडळाने नमूद केले की, अशा गंभीर, क्रूर व घृणास्पद गुन्ह्यांमुळे महिलांवरील व मुलींवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर व निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे. सदर गुन्हा अत्यंत जघन्य स्वरूपाचा असून, आरोपीस कठोर शिक्षा झाली नाही तर भविष्यात अशा विकृत प्रवृत्तीना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, आरोपी अल्पवयीन असला तरी त्याने केलेल्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता कायद्याच्या चौकटीत सज्ञान आरोपीप्रमाणे कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल व महिलांमध्ये व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट होईल, अशी मागणी प्रतिष्ठा महिला मंडळाने केली आहे. निवेदनावर सौ रजनी संजय सावकारेअनिता आंबेकर, सौ शैलना पुरुषोत्तम नारखेडे, सो. वैशाली मनिष सेतवाल
सौ. सीमा प्रशांत नरवाडे , सौ वंदना प्रविण सोनार , दिपाली परिक्षित ब्रहाटे सोनल रमाकांत महाजन, . शारदा दिपक धांडे, अर्चना विलास सातदिवे. प्रिया बोधराज चौधरी , प्रिती मुकेश पाटील यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरी आहेत .


