भुसावळ नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा 3 फेब्रुवारीला; भाजप नगरसेवकांचे विषय अजेंड्यावरून वगळले…

भुसावळ (प्रतिनिधी) – नगरपालिकेत सत्तांतरणानंतर पहिली सर्वसाधारण सभा येत्या 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेसमोर तब्बल 249 विषयांचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील एकही विकासात्मक विषय अजेंड्यावर न घेतल्याने पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

शहरातील भाजपचे नगरसेवक निवडून आलेल्या 11 प्रभागांमधील एकही विषय अजेंड्यावर नसल्याचे समोर आले आहे. याउलट अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवक असलेल्या तब्बल 14 प्रभागांतील विकासकामांचे विषय अजेंड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे शहरातील राजकीय कुरघोड्या अधिक तीव्र झाल्या असून, सत्ताधाऱ्यांवर पक्षीय राजकारणाचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी भाजप सत्तेत असताना त्यांनीही विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील विषय अजेंड्यावर न घेतल्याचा दाखला दिला जात असून, सध्याचे नगराध्यक्ष तोच पायंडा पुढे नेत असल्याची चर्चा आहे.