मध्य रेल्वे सतर्कता पथकाची कारवाई; बनावट सतर्कता अधिकारी रंगेहात पकडला

मुंबई ,( प्रतिनिधी )

मध्य रेल्वेच्या सतर्कता पथकाने (विजिलन्स) बनावट रेल्वे बोर्ड सतर्कता निरीक्षक बनून रेल्वे कर्मचाऱ्याकडून लाच मागणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहात पकडल्याची महत्त्वाची कारवाई केली आहे. ही कारवाई दि.22 जानेवारी 2026 रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

रेल्वे कर्मचाऱ्याने दिलेल्या माहिती व तक्रारीच्या आधारे मध्य रेल्वे सतर्कता पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान हरीश कांबले या व्यक्तीस तक्रारदाराकडून ₹20,000 लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. आरोपीने स्वतःला रेल्वे बोर्डचा सतर्कता निरीक्षक असल्याचे भासवून, मुंबई येथील डीआरएम कार्यालयातील थकीत देयके मंजूर करून देण्याच्या बहाण्याने सदर रकमेची मागणी केली होती.

यापूर्वीही आरोपीने तक्रारदाराकडून ₹60,000 ची रक्कम ऑनलाइन पद्धतीने घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित रक्कम कधीच अधिकृत खात्यावर जमा झाली नाही. त्यानंतर पुन्हा थकीत देयक लवकर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने तक्रारदाराशी संपर्क साधला. संशय बळावल्याने तक्रारदाराने सतर्कता विभागाकडे तक्रार दाखल केली, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या हरीश कांबले याला पुढील कार्यवाहीसाठी जीआरपी कल्याण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 318(2) व 319(2) नुसार फसवणूक व प्रतिरूपण (तोतयागिरी) या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये दंडासह ३ ते ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

मध्य रेल्वेने भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहिष्णुतेची भूमिका पुन्हा स्पष्ट केली असून, रेल्वे कर्मचारी व नागरिकांनी अशा कोणत्याही फसवणुकीच्या प्रकारांबाबत सतर्क राहून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.