मुंबई, २१ जानेवारी २०२६ :
मध्य रेल्वेच्या ७०व्या विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ९८ रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वे सभागृहात आयोजित या भव्य समारंभात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार व शिल्ड प्रदान करण्यात आल्या.

यावेळी भुसावळ व नागपूर विभागांना संयुक्तपणे समग्र दक्षता शिल्ड प्रदान करण्यात आली. तसेच विविध विभाग, कारखाने व स्थानकांना एकूण २४ शिल्ड देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व दीपप्रज्वलनाने झाली. महाव्यवस्थापकांचे स्वागत प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी श्री पी. पी. पांडे यांनी केले.
शिल्ड वितरणाचा तपशील :
भुसावळ विभागाने विद्युत, लेखा, कार्मिक, वैद्यकीय, भांडार (स्टोअर्स) तसेच स्वच्छतेसाठीची उत्कृष्ट विभाग शिल्ड अशा एकूण ६ शिल्ड पटकावल्या. NSG-1 ते NSG-4 श्रेणीतील स्वच्छतेसाठीची उत्कृष्ट स्थानक शिल्ड अकोला स्थानकाने मिळवली.
नागपूर विभागाने संरक्षा, परिचालन तसेच सिग्नल व दूरसंचार अशा ३ शिल्ड मिळवल्या.
मुंबई विभागाने वाणिज्य, सुरक्षा, पर्यावरण व गृहव्यवस्थापन (EnHM) या ३ शिल्ड तसेच पुणे विभागासोबत संयुक्तपणे यांत्रिकी विभागाची शिल्ड मिळवून एकूण ४ शिल्ड पटकावल्या. स्वच्छतेसाठीची उत्कृष्ट स्थानक शिल्ड (NSG-5, NSG-6 व SG-1 ते SG-3) इगतपुरी स्थानकाने, तर उत्तमरीत्या जपलेल्या बागेसाठीची द्वितीय क्रमांकाची शिल्ड लोणावळा स्थानकाने मिळवली.
पुणे विभागाने अभियांत्रिकी व वेळपालन (पंक्च्युअलिटी) या २ शिल्ड तसेच मुंबई विभागासोबत संयुक्तपणे यांत्रिकी शिल्ड मिळवली. सांगली स्थानकाने उत्कृष्ट बागेसाठीची शिल्ड पटकावली.
सोलापूर विभागाला कार्य कार्यक्षमता व ट्रॅक मशिन शिल्ड मिळाली.
माटुंगा कारखान्याला (विद्युत/यांत्रिकी) कारखाना कार्यक्षमता शिल्ड, तर वर्धा निर्माण युनिटला “उत्कृष्ट निर्माण युनिट” शिल्ड प्रदान करण्यात आली.
वैयक्तिक पुरस्कार :
वैयक्तिक श्रेणीत मुंबई विभाग आघाडीवर राहिला असून २८ कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळाला. मुख्यालयातील २१, नागपूर विभागातील १७, भुसावळ विभागातील १६ तसेच पुणे व सोलापूर विभागांतील प्रत्येकी ७ कर्मचाऱ्यांना “विशिष्ट रेल सेवा पुरस्कार” देण्यात आला.
महाव्यवस्थापकांचे मार्गदर्शन :
प्रसंगी बोलताना श्री विवेक कुमार गुप्ता यांनी रेल्वे बोर्ड पातळीवर मध्य रेल्वेने मिळवलेल्या ५ शिल्ड ही मोठी उपलब्धी असल्याचे नमूद केले. “लोकांच्या रेल्वेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षितता, तंत्रज्ञान, नवोन्मेष व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा प्रभावी वापर आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
२०२६ साठी ५२ आठवड्यांत ५२ सुधारणा, देखभाल-दुरुस्तीचे आधुनिकीकरण, प्रशिक्षण व कौशल्य विकासावर भर, तसेच बदलत्या काळानुसार मानसिकतेत बदल घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास अपर महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी, प्रधान विभागप्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अधिकारी-कर्मचारी, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या पदाधिकारी व मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला असून संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात आले.


