भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिकेचे कामकाज श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतर करण्याच्या निर्णयावरून शहरातील राजकारण तापले आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी भाजपाने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या आंदोलनानंतर पालिका रुग्णालयात सुरू असलेले तोडफोडीचे काम तात्पुरते थांबवण्यात आले.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. पालिकेचे स्थलांतर निश्चितच होणार असून त्यासाठी अधिकृत ठराव केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलन म्हणजे अधिकाऱ्यांवर दबाव
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या आंदोलनावर तीव्र टीका केली. प्रांताधिकारी यांच्या दालनात केलेले आंदोलन म्हणजे अधिकाऱ्यांवर टाकलेला दबाव असून हा प्रकार निषेधार्ह आहे. अशा पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
नऊ वर्षांच्या कामांचे होणार ऑडिट
गेल्या नऊ वर्षांत शहरात झालेल्या सर्व विकासकामांचे सखोल ऑडिट करण्यात येणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांत पालिकेवर प्रशासक राजवट होती, तर त्याआधी पाच वर्षे भाजपाची सत्ता होती. या काळात कोणते रस्ते झाले, कुठे गटारे बांधली गेली, याचे ‘दुध का दुध, पाणी का पाणी’ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासकामे सुरू असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
अधिकाऱ्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही
अनुप खोब्रागडे म्हणाले की, प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात टेबल वाजवणे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचा अवमान आहे. अशा प्रकारचे कृत्य राष्ट्रवादी खपवून घेणार नाही. गरज पडल्यास आम्हीही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
‘आंदोलन नव्हे, धिंगाणा’
जयंत लोणारी यांनी भाजपावर टीका करताना सांगितले की, प्रांताधिकारी कार्यालयात जे झाले ते आंदोलन नव्हे, तर धिंगाणा होता. नऊ वर्षांत काय विकासकामे केली, याचे उत्तर भाजपाने द्यावे. पालिका रुग्णालयात सध्या मेंटेनन्सची कामे सुरू असून त्याबाबत मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश आहेत. अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले.
जनतेच्या कामातून मिळाली उपाधी
माजी नगरसेवक रवी सपकाळे म्हणाले की, युवराज लोणारी यांना ‘शिल्पकार’ ही उपाधी जनतेसाठी केलेल्या कामातूनच मिळाली आहे. ते याआधीही माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासोबत काम करत असताना विकासाचेच राजकारण करत होते.
पराभव मान्य नसल्याची टीका
माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी भाजपावर टीका करताना सांगितले की, प्रांताधिकारी दालनात टेबलावर हात टेकून केलेले आंदोलन चुकीचे आहे. पराभव स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. विरोधकांच्या आरोपांना आम्ही विकासकामांतूनच उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थिती
या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, माजी नगरसेवक रवी सपकाळे, अनुप खोब्रागडे, तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे, जयंत लोणारी, शहराध्यक्ष अश्रफ खान, प्रकाश कोळी (खन्ना), प्रा. उत्तम सुरवाडे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


