खडसे कॉलेजमध्ये पक्षी ओळख व पक्षीवैविध्य कार्यशाळा उत्साहात संपन्न :

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – येथील खडसे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “Bird Identification & Avian Diversity in India” या विषयावर चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या वतीने यशस्वी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख (HOD) डॉ. आर. टी. चौधरी व डॉ. संतोष थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना मुक्ताईनगर परिसरातील हातनूर जलाशयाच्या बॅकवॉटर भागात आढळणाऱ्या स्थलांतरित पाणपक्ष्यांची ओळख करून देण्यात आली. PPT सादरीकरणाच्या माध्यमातून पक्षी ओळख पद्धती, विविध अधिवास आणि भारतातील समृद्ध पक्षीवैविध्य याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने चातक दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. तसेच जैवविविधतेच्या अभ्यासात क्षेत्रीय अनुभव व प्रत्यक्ष निरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या कार्यशाळेत समीर नेवे व अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जिज्ञासू प्रश्न आणि चर्चेमुळे ही कार्यशाळा अत्यंत संवादात्मक व प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पक्षीनिरीक्षण व निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.