भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील खडका रोडवरील बडा खानका, मुस्लिम कॉलनी परिसरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोरदार कारवाई करत पाच संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व तब्बल १६ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एकूण १२ संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील बडोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या शोधासाठी भुसावळ येथे आले होते. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी हर्षल महाजन व प्रशांत सोनार यांच्या मदतीने ता. १५ रोजी बडा खानका परिसरात कारवाई सुरू असताना संशयित करार अली हुजूर अली याला ताब्यात घेण्यात आले. मात्र यावेळी काही इराणी महिला व पुरुषांनी पोलिसांवर विटा व लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मध्यप्रदेशातील चार पोलीस कर्मचारी व बाजारपेठ पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी जखमी झाला होता.
या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी संयुक्तरित्या ता. १६ रोजी पहाटे पाच वाजता कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कारवाई दरम्यान संशयित मजहर अब्बास जाफर इराणी यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व १६ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. गुन्ह्यातील पाच संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईमुळे भुसावळ व परिसरातील चैन स्नॅचिंगसह इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे .



