भुसावळ (प्रतिनिधी) –
तालुक्यातील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर, खडके येथे मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी बाल मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवाजी विद्या प्रसारक मंडळाच्या सदस्या व संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई दिलीप भोळे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिवाजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. दिलीप आत्माराम भोळे, सौ. जयश्रीताई भोळे तसेच संचालक मंडळातील सदस्य नंदकिशोर चौधरी, अशोक सरोदे, उदयसिंग पाटील, विष्णू मोरे, गोपाळ भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाल मेळाव्यात शाळेतील बालवाडीपासून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने घरून विविध खाद्यपदार्थ तयार करून ते शाळेत विक्रीसाठी ठेवले होते. ढोकळे, गोळ्या-बिस्किटे, कचोरी, समोसे, इडली, सोयाबीन वडी, मंचुरियन, पाणीपुरी, भेळ, फळांचे ज्यूस, कोथिंबीर वडी, पावभाजी, दाबेली अशा अनेक पदार्थांची रेलचेल होती.
या बाल मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पैशांचे व्यवहार, खरेदी-विक्रीची पद्धत, पैशांचा योग्य वापर व देवाण-घेवाण याचे प्राथमिक ज्ञान देणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
याच कार्यक्रमात सौ. जयश्रीताई भोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेस ११० गोष्टींची पुस्तके भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना केक व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय साखरे, उपशिक्षक ज्ञानदेव पाटील, निलेश महाजन, तसेच सौ. निलीमा फेगडे, वैशाली पाटील, माधुरी वाघ, ममता तळेले, आरती बडे, चारू झोपे व रोमाली वाघुळदे यांनी अथक परिश्रम घेतले.



