भुसावळच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य ; मात्र चुकीच्या कामांना विरोधच – युवराज लोणारी

भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. शैलजा नारखेडे तसेच तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी विकासाभिमुख आणि ठाम भूमिका मांडली आहे. भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांना भाजपकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल; मात्र चुकीच्या, नियमबाह्य आणि शहरहिताला बाधा आणणाऱ्या कामांना भाजप सर्वप्रथम विरोध करेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली.

युवराज लोणारी म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व विकासकामे या बाबींमध्ये राजकारण न आणता नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकासाच्या प्रत्येक चांगल्या निर्णयाला भाजप पाठिंबा देईल, मात्र गैरप्रकार, अनियमितता किंवा नियमबाह्य निर्णय सहन केले जाणार नाहीत.

या प्रसंगी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. शैलजा नारखेडे, भाजपचे उपगटनेते तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. भाजप संघटनेच्या एकजुटीच्या जोरावर आगामी काळात भुसावळ शहराच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रभावी भूमिका बजावली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.