भुसावळात खळबळ : चायनीज विक्री करणाऱ्या महिलेकडे गावठी कट्टा आढळला :

भुसावळ (प्रतिनिधी)

भुसावळ शहरात चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेकडे गावठी बनावटीचा कट्टा आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. १४) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास न्यायालय परिसरात शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

सायंकाळपर्यंत संबंधित महिलेकडून सखोल चौकशी सुरू होती, तसेच तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई

शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना न्यायालय परिसरात आलेल्या एका महिलेच्या दुचाकीत गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिस कर्मचारी राहुल बेनीवाल व दीपक शेवरे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित महिलेच्या स्कूटीची डिक्की तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. हा कट्टा जप्त करून महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला महिलेने समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सायंकाळपर्यंत पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत होती. संबंधित महिला चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करते. तिने हा कट्टा का बाळगला होता व तो कुणाकडून मिळवला, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

प्रथमच घडलेली घटना

शहरात यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडे गावठी कट्टा आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र प्रथमच व्यवसाय करणाऱ्या एका महिलेकडे गावठी कट्टा आढळून आल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पोलिस तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.