भुसावळ(प्रतिनिधी ) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला अत्याधुनिक हाय-स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन मनमाड येथे प्राप्त झाली आहे. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रेन मनमाड स्थानकावरील डबल एक्झिट लाईनवर तैनात करण्यात येणार आहे. ही ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे अपघातांच्या प्रसंगी तातडीचे बचाव व जीवनरक्षक कार्य अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या अत्याधुनिक ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेनमध्ये पूर्णपणे सुसज्ज ऑपरेशन थिएटर, हायड्रॉलिक रेस्क्यू डिव्हाइसेस व इक्विपमेंट, उच्च क्षमतेची प्रकाश व्यवस्था, प्लाझ्मा कटिंग उपकरणे तसेच एक्सोथर्मिक कटिंग साधनांचा समावेश आहे. या सर्व सुविधांमुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलद, अचूक आणि प्रभावी बचावकार्य करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, १४ जुलै २०२७ ते २५ सप्टेंबर २०२७ या कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने व्यापक आणि लक्ष केंद्रीत सुरक्षा सज्जता उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक रेल्वेमार्गे प्रवास करणार असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही अत्याधुनिक हाय-स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
ही ट्रेन पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय मदत, अडथळ्यांचे जलद निर्मूलन तसेच रेल्वे सेवा वेगाने पूर्ववत करणे शक्य होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची उच्च पातळी सुनिश्चित होण्यास मोठी मदत मिळणार आहे.


