आसाममधील गुवाहाटी येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील वस्त्रोद्योग मंत्र्यांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले. या महत्त्वाच्या संमेलनात महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी सहभाग घेत महाराष्ट्रातील विविध स्थानिक व पारंपरिक वस्त्र उत्पादनांची सविस्तर माहिती मांडली.

या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील हातमाग, पॉवरलूम, पारंपरिक कापड निर्मिती तसेच आधुनिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील भरीव योगदान अधोरेखित केले. वस्त्र उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य समृद्ध असून राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठी परंपरा आणि कौशल्य लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले.
संमेलनादरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी ना. संजय सावकारे यांची स्नेहपूर्ण व सखोल चर्चा झाली. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग विभागासमोरील विविध अडचणी, केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य, तसेच नवीन संधी, गुंतवणूक वाढविण्याचे मार्ग आणि रोजगारनिर्मितीच्या शक्यतांबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
या चर्चेमुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, गुंतवणूक वाढेल आणि स्थानिक कारागिरांना व उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



