मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या जनसंपर्क अधिकारीपदी बी. बी. तपस्वी यांची नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) :
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले बी. बी. तपस्वी यांनी भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विभाग व नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी, पारदर्शक व तत्पर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बी. बी. तपस्वी हे भारतीय रेल्वेतील अनुभवी अधिकारी असून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. प्रशासकीय कार्यक्षमता, प्रवासी-केंद्रित दृष्टीकोन तसेच सार्वजनिक संवाद कौशल्यांमुळे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून त्यांनी प्रवासी सुविधा, तिकीट व्यवस्थापन, महसूलवाढ, ग्राहक समाधान आणि सेवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील कार्यपद्धती, विकासात्मक उपक्रम, प्रवासी सुविधा, सुरक्षा, स्वच्छता तसेच विविध रेल्वे योजनांची माहिती प्रसारमाध्यमे व जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मध्य रेल्वे भुसावळ विभाग प्रशासनाने बी. बी. तपस्वी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या कार्यकाळात जनसंपर्क कार्य अधिक गतिमान व परिणामकारक होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.