भुसावळात व्यापारी व हातगाडी चालकांचा वाद थेट पोलिस ठाण्यात : भीतीपोटी बाजारपेठ दुपारपर्यंत बंद :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वर्दळीच्या अप्सरा चौकात दुचाकी पार्किंगवरून व्यापारी व हातगाडी (लोडगाडी) चालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाने उग्र स्वरूप धारण केले. वाद वाढल्यानंतर व्यापारी व विक्रेते थेट बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले. संभाव्य अनुचित प्रकाराच्या भीतीने व्यापार्‍यांनी शुक्रवारी (दि. 9) दुपारपर्यंत आपली दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.

सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अप्सरा चौकातील एका दुकानासमोर मोटारसायकल उभी करण्यावरून लोडगाडी चालक व दुकानदारामध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद हळूहळू वाढत गेल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून गाठले पोलिस ठाणे

संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने छबीलदास कपडा मार्केटमधील अनेक व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद केली. अचानक बाजारपेठ बंद झाल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. घटनेनंतर व्यापारी व ठेलेवाले मोठ्या संख्येने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असल्या तरी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी अप्सरा चौक व परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

हॉकर्स झोनबाबत पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, पालिकेने हॉकर्स झोन जाहीर करूनही त्यासंबंधी ठोस धोरण व आवश्यक सुविधा उपलब्ध न केल्याने व्यापारी व विक्रेत्यांमधील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. अप्सरा चौक हा शहरातील अत्यंत गजबजलेला भाग असून यापूर्वीही येथे व्यापारी व लोडगाडी चालकांमध्ये वाद झाले आहेत. हॉकर्स झोनमध्ये जागा निश्चित करूनही पायाभूत सुविधा न दिल्याने हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

वेळीच सत्ताधारी व पालिका प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढला नाही, तर भविष्यातही अशा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.